Wednesday, 20 April 2011

अजून राधा


यमुनेचे जळ कंप पावते ह्रदय तिचे धडधडते रे
मुके हुंदके कानी पडती अजून राधा रडते रे

कशास रचला रासरंग तू, सूर वेणूचे आळवले
नंदनवन का माझ्यासाठी यमुनातीरावर रचले?
कदंब-शाखेवरची कोकीळ झोपेतच थरथरते रे

मन लोणी मम तन लोणी, नयनामधले द्रव लोणी
तू गेल्यावर लपून आता चोरायाचे ते कोणी 
तू ना येसी, वेडे मन पण तुझीच चाहूल घेते रे

रंग फिके या होळीचे शाम तुझ्या रंगापुढती
नयना मधले काजळ वाहे अश्रू सावळे ओघळती
रंगामध्ये तन भिजते मन भिजण्या आतुरते रे

-स्वानंद 


वेड्या मनात माझ्या तू जागवली होतीस प्रीत
जगावेगळे नाते आपुले जगावेगळी रीत 
एकटी झुरते आता अन सैरभैर मी फिरते रे!

गुंतले हे प्राण तुझ्यात करिते मी शोक 
भिन्न शरीरे असूनही आत्मा मात्र एक
काजळरात्री डोळे मिटूनी श्यामल मूर्ती स्मरते रे!
-आकांक्षा

Inspiration: swanand marulkar
http://amrutsanchay.blogspot.com

Sunday, 17 April 2011

प्रेमाचा अर्थ मला आता तरी समजेल का?

तुझ्या जीवनात स्थान मला लाभेल का?
प्रेमाचा अर्थ मला आता तरी समजेल का?

मी तुझी जाहले परंतु मी न माझी राहिले
पाहण्याआधी स्वतःला तुलाच मी पहिले
गुज माझ्या मनीचे अंतरी तुझ्या पोचेल का?
प्रेमाचा अर्थ मला आता तरी समजेल का?

गुणगुणते गाणे ओठावर माझ्या सजते
विचारांत तुझ्या मन चिंब चिंब भिजते 
आपुल्यातला दुरावा सांग ना मिटेल का?
प्रेमाचा अर्थ मला आता तरी समजेल का?

 प्रेमात नसतं काही चूक काही बरोबर
भावना तुझ्यासाठी आहेत या खरोखर
तुझी वाट बघणे कधी तरी संपेल का?

स्वप्न तुझ्यात हरवण्याचे!!!


तुझ्यामुळे तुझ्यापरि तुझीच जाहले
तुझ्यात हरवण्याचे एक स्वप्न पाहिले....!!

उगीच तुझी आस ह्या मनास लागली
स्वप्नी तुझीच कल्पना मनात जागली
धुंद होऊनी आज प्रिती गायली
ह्रदयी तुझ्या अस्तित्वाचे भाग्य मला लाभले!!१!!

मनमनीच्या भावनांनी गीत लागले फुलू
आठवणींच्या हिंदोळ्यावर मन लागले झुलू
रम्य स्वप्नीच्या ठिकाणी भान लागले हलू
प्रेमाची शपथ घेत सूर मी झंकारिले!!२!!

दिस सरले,रुतू फिरले,काळ लोटले
क्षितीजावरी आजवर तुलाच शोधिले
वाट पाहताना तुझी स्वप्न माझे भंगले
मनमोत्यांच्या माळेतील सर्व मोती सांडले!!३!!

ठाऊक आहे मला फरक आहे स्वप्न आणि सत्यात
शतकांपासून सुन्न दूरावा आहे अपुल्या नात्यात
स्वप्नात पाहिलेले सुख अधुरे राहिले
शेवटी ते स्वप्न येऊन सत्यात थांबले!!४!!

श्रावणसरी


पावसात ही कधी श्रावण लपून गायचा

अशाच धुंद वेळी आपुला श्वास एक व्हायचा !

माझे तुझ्यात गुंतत जाणे
तुझ्यात स्वतःला शोधणे
सोबतीत तुझ्या मनाचे ते मोहणे
मुग्ध होऊनी कधी ऋतू तो बहरायचा !

होतास तू जवळ सुख होते माझ्या पदरी
पूर्णत्वाची भाषा होती थरथरत्या अधरी
लाटा उमटल्या होत्या मनीच्या सागरी
पाऊस आपुल्याला एकत्र भिजवायचा !

चैत्राची पालवी कोमेजून गेली
वैशाख वणवा पसरला स्वप्ने विस्कटून गेली
सरले ते दिस वेळ ती सरली
आता फक्त तुझा सहवास तो आठवायचा !